23 कोटींचा घोटाळा, मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ अटकेत

Jalna Merchant Bank Fraud: 23 कोटींचा घोटाळा, मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ अटकेत

जालना मर्चंट बँक घोटाळा: 23.33 कोटींचा अपहार, मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ अटकेत; 8 दिवसांची पोलीस कोठडी

जालना, 16 एप्रिल 2026 — Jalna Merchant Bank Fraud प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ याला अटक केली आहे. आरोपीला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे.

या प्रकरणातील तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पंचमुखी वेअर हाऊसचे संचालक रायचंद कुरंगळ यांनी जालना मर्चंट बँकेसोबत करार करून शेतकरी व मालधारकांचा कृषी माल वेअरहाऊसमध्ये साठवून त्यावर कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था केली होती. वेअरहाऊसकडून दिलेल्या पावत्या व टॅगच्या आधारे बँकेने न्यू मार्केट यार्ड जालना, भोकरदन, अंबड, देऊळगाव राजा, गेवराई आणि मंठा या शाखांमधून एकूण 177 खातेदारांना कर्ज वितरित केले.

मात्र, या खातेदारांपैकी 133 जणांनी कर्जाची परतफेड न करता थकबाकीदार झाले. बँकेने वारंवार नोटिसा देऊनही वसुली झाली नाही. त्यानंतर बँकेने नियमांनुसार तारण ठेवलेल्या मालाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली असता आरोपी व संबंधित कर्जदारांनी अडथळा निर्माण केला.

यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेअरहाऊसमध्ये जाऊन प्रत्यक्ष मालाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी कुरंगळ यांनी जवळपास दोन महिन्यांपासून टाळाटाळ करत माल दाखविण्यास नकार दिला. यामुळे संबंधित तारण माल गोडाऊनमध्ये अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले आणि Jalna Merchant Bank Fraud प्रकरणातील मोठा अपहार उघडकीस आला.

या संदर्भात बँकेच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनझीरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत विविध कलमांनुसार सुमारे 23 कोटी 33 लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. Jalna Merchant Bank Fraud प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top