jalna motibag fight youth death news

जालन्यात हेल्यांच्या टकरीवरून वाद विकोपाला; तरुणाचा मृत्यू, मोतीबाग परिसरात तणाव

जालना | प्रतिनिधी : जालना शहरातील मोतीबाग परिसरात हेल्यांच्या टकरीवरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने भीषण रूप धारण करत अखेर एका तरुणाचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये हेल्यांच्या टकरीवरून वाद सुरू झाला. सुरुवातीला हा वाद केवळ शाब्दिक चकमकीपुरता मर्यादित होता. मात्र, काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गट आमनेसामने येत लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

या हाणामारीत रवि अशोक लाड (वय २८), प्रेम लाड (वय २०) आणि नरेश अवघड (वय २०) हे तिघे जखमी झाले. तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी रवि लाड यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास रवि लाड यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

या घटनेनंतर मोतीबाग परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा लहानसहान वाद कसे जीवघेणे ठरू शकतात, याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top