जालना जिल्ह्यातील कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ता डि.जे. राठोड यांनी या घोटाळ्याच्या विरोधात अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले असून, दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगारांच्या मृत्यूवर त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी सुमारे अडीच लाख रुपयांची मदत अनेक दलालांनी आणि काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून फसवणुकीने काढून घेतली. या प्रकरणात जीवंत कामगारांना मृत दाखविणे आणि काही मृत व्यक्तींना कागदोपत्री जीवंत दाखवून अन्य योजनांचा लाभ उचलणे, अशा मोठ्या प्रमाणात फर्जीवाडा झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक वेळा विविध योजनांचा लाभ दाखवून कोट्यवधी रुपयांची हेराफेरी झाल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, या गंभीर गैरव्यवहाराबाबत कामगार आयुक्तांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी, सतर्कता पथकाने केवळ वरवरची चौकशी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
राठोड यांचा आरोप आहे की, ज्यांनी बनावट शिक्के, बोगस दाखले तयार करून फसवणूक केली त्या दलालांवर कारवाई करण्याऐवजी एका वृद्ध व्यक्तीवर गुन्हा दाखल करून खोटी कारवाई केली गेली. यामागील उद्देश दोषी दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांना वाचविण्याचा असल्याचा त्यांचा आरोप आहे.
या घोटाळ्यामुळे अनेक वास्तविक लाभार्थ्यांना हक्काची मदत मिळाली नाही, तर लाखो रुपये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि दलालांच्या खिशात गेले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत डि.जे. राठोड यांचे उपोषण सुरुच आहे.
राठोड यांनी सांगितले की, “कामगारांचे हक्क खाल्ले गेले आहेत. हा केवळ आर्थिक घोटाळा नाही तर मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास माझे उपोषण थांबणार नाही.”
जालना जिल्ह्यातील या मोठ्या गैरव्यवहारामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप असून, प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
