Massive Corruption Exposed in Sindkhed Raja Panchayat Samiti

सिंदखेडराजा पंचायत समितीतील भ्रष्टाचार उघड – मनसे नेते राजेश इंगळे यांचा आरोप, तात्काळ कारवाईची मागणी

बुलढाणा (सिंदखेडराजा तालुका) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिवहन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी सिंदखेडराजा पंचायत समितीतील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मौजे कुंबेफळ या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विहीर योजनेंतर्गत विहीर मंजुरीसाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आणि ती वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मनसेने उघड केला भ्रष्टाचाराचा व्हिडीओ

राजेश इंगळे यांच्या मते, कुंबेफळ येथील लाभार्थी अनिल रामचंद्र डोळे, शिवहरी अत्रुबा डोळे, रामेश्वर हरिदास जाधव आणि विकास प्रकाश चव्हाण यांनी विहीर मंजुरीसाठी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. मात्र, ग्रामसेविका एस.के. जगताप (जगताप मॅडम), तांत्रिक सहायक श्री. शेळके आणि रोजगार सेवक प्रल्हाद नागरे या तिघांनी मिळून ५० हजार रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा संपूर्ण प्रकार लाभार्थी अनिल डोळे यांनी व्हिडीओमध्ये टिपला असून, त्यात पैसे कसे घेतले गेले याचे स्पष्ट विवरण दिले आहे. त्यामुळे पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचा चेहरा उघड झाला आहे.

सरपंचांनाही ठेवले अंधारात

या प्रकरणात कुंबेफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मंगला राजेश इंगळे यांनी सांगितले की, विहीर मंजुरीसंदर्भातील सर्व व्यवहार ग्रामपंचायतीच्या माहितीत न आणता केले गेले. त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

मनसेची कडक भूमिका – कारवाई न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

“सिंदखेडराजा तालुक्यात विहीर मंजुरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी राजेश इंगळे यांनी केली आहे.

त्याचबरोबर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सात दिवसांच्या आत निलंबित करण्यात यावे, अन्यथा मनसे जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Watch This News Video On Youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top