ठाणे जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमुळे टोल वसुलीतही मोठा वाढ झाल्याचे समोर आले आहे. नागपूर ते मुंबई असा संपूर्ण महामार्ग खुला झाल्यापासून एका महिन्यात तब्बल १२ लाख वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाकडून (MSRDC) देण्यात आलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात टोलच्या माध्यमातून १० कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा हा प्रवास आता अधिक सुलभ आणि जलद झाल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्गाचा वापर करत आहेत.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झाला होता. त्यानंतर ३ जून २०२५ पर्यंत एकूण २ कोटी १२ लाख वाहनांनी या महामार्गावरून प्रवास केला आहे. मात्र, ठाणे टप्पा सुरू झाल्यापासून केवळ काही आठवड्यांतच एकूण वाहतूक २ कोटी २४ लाखांवर गेली आहे, म्हणजेच अतिरिक्त १२ लाख वाहनांची नोंद झाली आहे.
या मार्गावर दररोज सरासरी ३६ ते ३७ हजार वाहने प्रवास करत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नागपूर ते शिर्डी टप्पा यापूर्वीच सुरु झाला होता आणि आता शिर्डी ते ठाणे असा अखेरचा टप्पाही खुला झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला आहे. या महामार्गाची एकूण लांबी ७०१ किलोमीटर असून, तो पूर्णपणे ‘कंट्रोल्ड अॅक्सेस’ म्हणजेच मर्यादित प्रवेश असलेला महामार्ग आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ६९ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. महामार्गामुळे राज्याच्या विविध भागांना राजधानी मुंबईशी जलद आणि थेट संपर्क मिळाला असून, त्यामुळे वाहतूक, व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा चालना मिळत आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या सतत वाढत आहे.
राज्य सरकारसाठी ही टोल वसुली आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे आणि आगामी काळात या महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More : Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana अंतर्गत जालना जिल्ह्यात ₹250 कोटींचा घोटाळा!
