जालना (२२ जुलै) – जालना तालुक्यातील मलशेंद्रा गावात २२ जुलै रोजी पैशांच्या वादातून एका तरुणाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेनंतर २४ तास उलटूनही पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब उत्तम साठे या तरुणाला अज्ञात व्यक्तींनी कारमध्ये बसवून जबरदस्तीने अपहरण केले. या प्रकरणी त्यांचे भाऊ रत्न उत्तम साठे यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे अपहरण आर्थिक वादातून घडले आहे.
घटनेनंतर एक दिवस उलटून गेला तरी पोलीसांनी ना कुठल्याही संशयिताला अटक केली आहे, ना तपासात कोणतीही ठोस प्रगती झाली आहे. यामुळे मलशेंद्रा गावातील ग्रामस्थांनी आज तालुका पोलीस ठाण्यावर धाव घेत तीव्र संताप व्यक्त केला.
या प्रकरणी गावचे सरपंच विजय लहाणे यांनीही पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप केले. “गावातील तरुणाचे अपहरण झाल्यावर देखील पोलिसांनी तत्काळ कारवाई न करता दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ग्रामस्थांची मागणी आहे की, पोलिसांनी त्वरित आरोपींना अटक करावी आणि भाऊसाहेब साठे यांचा शोध लावावा. पोलिसांनी देखील यावेळी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, पुढील तपास जलदगतीने करण्यात येईल.
दरम्यान, मलशेंद्र्यात या घटनेमुळे तणावाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून न्यायाची मागणी केली आहे.
Read More : जालना पोलिसांची मोठी कारवाई: साडे पाच लाख रुपयांची देशी-विदेशी दारू नष्ट

One thought on “पैशांच्या वादातून मलशेंद्रा येथील तरुणाचे अपहरण; २४ तास उलटल्यानंतरही पोलीस अपयशी”