जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात अर्पिता रावसाहेब वाघ या तरुणीचा मध्यरात्री मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता पहाटेच अंत्यविधी केल्याने पोलिस कारवाई, वडील व दोन भाऊ चौकशीसाठी ताब्यात.
जालना तालुक्यातील वंजार उमरद गावातील धक्कादायक घटना
जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वंजार उमरद गावात एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव अर्पिता रावसाहेब वाघ असे असून, ही घटना सोमवार मध्यरात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताचा मृत्यू सोमवार रात्री सुमारे अडीच वाजता झाला. कुटुंबीयांनी सांगितले की तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या घटनेनंतर पोलिसांना माहिती न देता कुटुंबीयांनी पहाटेच अंत्यविधी उरकून घेतला.
पोलिसांना कळताच स्मशानभूमीत धाव
घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली. त्यावेळी अर्पिताचा मृतदेह जळत होता. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पंचनामा करून मृतदेहाची माहिती घेतली.
परस्पर अंत्यविधीवरून गुन्हा दाखल
पोलिस अधीक्षक अजय कुमार बणसल यांनी सांगितले की, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेहाचा अंत्यविधी केल्यामुळे वेगळा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कुटुंबीय ताब्यात
या संशयास्पद मृत्यूच्या आणि परस्पर अंत्यविधीच्या प्रकरणी मृत तरुणीचे वडील व दोन भावांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करत असून मृत्यूचे खरे कारण उघडकीस येण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांचा इशारा
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पोलिसांच्या परवानगीशिवाय अंत्यविधी केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
