जालना जिल्हा पोलिस दलामध्ये सध्या 19 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पॉक्सो गुन्हे, हुंडाबळी तसेच अंमली पदार्थ विरोधी कारवाया असे विविध गंभीर गुन्हे घडत असतात. या घटनांमध्ये पुरावे गोळा करताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जालना जिल्हा पोलिस दलासाठी अत्याधुनिक तीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या व्हॅन्स 24×7 उपलब्ध असणार असून संबंधित उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या देखरेखीखाली कार्यरत राहतील.
सदर फॉरेन्सिक व्हॅन्समध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व आधुनिक साधनसामुग्री, किट्स आणि रसायने बसविण्यात आली आहेत. यामुळे कोणत्याही घटनास्थळी तात्काळ भेट देत वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करणे शक्य होणार आहे.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्समुळे आरोपीविरुद्ध न्यायालयात मजबूत पुरावे सादर करता येणार असून गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मोठी मदत होणार आहे. जालना, भोकरदन आणि परतूर या तीन उपविभागांना प्रत्येकी एक फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आली आहे. या व्हॅन्स संबंधित क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहतील.
जालना जिल्ह्यात गुन्ह्यांची वैज्ञानिक तपासणी अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होण्यासाठी या व्हॅन्स मोठी भूमिका बजावतील, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
