जालना | प्रतिनिधी
Jalna Knife Attack या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. जालना–मुख्य महामार्गावरील विशाल कॉर्नर परिसरात आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय तरुणावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव बडीराम भरत रंगडे (वय 23, रा. छाबडा हॉस्पिटल परिसर, जालना) असे आहे. घटनेच्या वेळी विशाल कॉर्नर परिसरात मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांनी दाखवली तत्परता
हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिक व काही रिक्षा चालकांनी जखमी तरुणाला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, घाटी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जखमी तरुणाला सुमारे अर्धा ते पाऊण तास उपचाराविना थांबावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.
खासगी रुग्णालयात उपचार
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या मध्यस्थीने जखमी तरुणाला नातेवाइकांच्या मदतीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचा घटनास्थळी तात्काळ तळ
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांची प्रतिक्रिया
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले की,
“विशाल कॉर्नर येथे एका युवकावर चाकू हल्ला झाला आहे. युवकाच्या पोटात वार झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल.”
आरोपींचा शोध युद्धपातळीवर
Jalna Knife Attack प्रकरणातील अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
दिवसाढवळ्या घडलेल्या या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
