जालना : जालना ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-752I वर नूर हॉस्पिटलपासून ग्रेडर टी पॉईंटपर्यंत अनेक पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे व इतर व्यावसायिक आस्थापनांसमोरील रस्त्यावरील दुभाजक (मीडियन) अनधिकृतपणे तोडण्यात आले होते. या बेकायदेशीर तोडफोडीमुळे या महामार्गावर गंभीर तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण अलीकडे झपाट्याने वाढत होते. नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी पोलिस संरक्षणात मोठी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात आल्या. विशेष म्हणजे, पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे व आस्थापनांसमोरील अनधिकृतपणे तोडलेल्या एकूण 23 दुभाजकांची पुनर्स्थापना करण्यात आली.
प्रशासनाचे म्हणणे आहे की, दुभाजक तोडल्यामुळे रस्त्यावरून वळसा न घेता सरळ वाहन आत–बाहेर केल्याने अपघाताची शक्यता अनेक पटींनी वाढते. अनेक अपघातात हीच मुख्य कारणे आढळून आली आहेत. त्यामुळे दुभाजकाचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दुभाजकाची पुनर्स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जालना पोलिसांनी संबंधित पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबा आणि इतर व्यावसायिक आस्थापनांचे मालक व चालकांना औपचारिक नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसांमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, यानंतर कोणीही व्यक्ती दुभाजक अनधिकृतपणे तोडल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुभाजक तोडणे हे कायद्याने गुन्हा असून यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होतो, असेही पोलिसांनी नमूद केले.
जालना जिल्हा पोलीस दलाने नागरिक व व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक सुरक्षेसाठी कोणतीही बेपर्वाई अथवा बेकायदेशीर हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. दुभाजक तोडण्यासारखे प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असेही पोलीस विभागाने स्पष्ट केले.
यामुळे NH-752I वरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षा वाढण्यास मदत होणार असून बेकायदेशीर रस्ता प्रवेशावर यामुळे मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
