जालना | प्रतिनिधी : लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट सरकारी वेबसाइट तयार करून नागरिकांना लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आरोपीला जालना पोलिसांनी अटक केली असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
या प्रकरणी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत कडुबा बावस्कर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अज्ञात आरोपींनी बनावट वेबसाइट तयार करून सरकारी संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश केला व शासकीय प्रक्रियेचा गैरवापर करून नागरिकांना बेकायदेशीररीत्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून दिले.
या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाणे, जालना येथे गुन्हा क्रमांक 23/2025 नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपीचा माग काढण्यात यश
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, जालना व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, डिजिटल ट्रेल आणि सायबर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन शिव भारती (वय 25 वर्षे) असे असून तो मूळचा गुवाहाटी, आसाम येथील रहिवासी आहे. आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत असल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत होत्या.
वाराणसी येथून आरोपी अटकेत
तपासादरम्यान आरोपी सध्या वाराणसी, उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर जालना पोलिसांच्या पथकाने वाराणसी गाठून आरोपीला ताब्यात घेतले. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी आरोपीस जालना येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आंतरराज्यीय सायबर टोळीचा संशय
या गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी कुपवाडा (जम्मू-कश्मीर), सहरसा (बिहार) व जालना येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, हे प्रकरण एका संघटित सायबर टोळीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींकडून आणखी बनावट वेबसाइट्स, आर्थिक व्यवहार व इतर सहकारी आरोपींबाबत माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गुणाजी शिंदे व त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कोणत्याही शासकीय सेवेसाठी केवळ अधिकृत सरकारी वेबसाइट्सचा वापर करावा. संशयास्पद लिंक, एजंट किंवा जलद सेवा देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जालना पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
