bullet bike seized jalna police action

जालना शहरात 62 बुलेट जप्त – कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर पोलिसांची मोठी कारवाई

जालना शहरात ट्रॅफिक पोलिस आणि विविध पोलिस ठाण्यांनी संयुक्त कारवाई करत 62 बुलेट गाड्या जप्त केल्या. कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून नष्ट करण्याची घोषणा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केली आहे.

जालना शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि कानठळ्या बसवणाऱ्या बुलेट गाड्यांवर पोलिसांनी मोठी मोहीम राबवली असून तब्बल 62 बुलेट गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ही मोहीम जालना शहर वाहतूक शाखा आणि शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे राबवली. यामध्ये विशेषतः सायलेन्सरमधून जोरात आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली. त्यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा आवाज आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात आली.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सदर बाजार, कदीम जालना आणि तालुका पोलिस ठाण्यांतील 7 अधिकारी आणि 40 कर्मचारी यांनी शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम राबवली.

जप्त केलेल्या सर्व बुलेट गाड्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. त्यावरील कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर काढून ते नष्ट करण्यात येणार असल्याचेही अधीक्षक बन्सल यांनी स्पष्ट केले.

या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून यापुढे सायलेन्सर बदलून बुलेट गाड्यांचा गोंगाट करणाऱ्यांवर दर आठवड्याला अशीच कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top