जालना पोलिसांची मोठी कामगिरी! भगतसिंग नगर येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लागला. आरोपी आकाश भास्कर लिखे जेरबंद, तर पोलिसांनी ₹6.64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
जालना (प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या प्रभावी कारवाईत भगतसिंग नगर येथील घरफोडी प्रकरण उघडकीस आले असून, आरोपीला अटक करून ₹6,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी गणेश बाबुराव वाढेकर (वय 43 वर्ष, रा. भगतसिंग नगर, नविन मोंढ्याच्या मागे, जालना) यांनी तक्रार दाखल केली होती की, दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी ते भाजीपाला विक्रीसाठी नाव्हा येथे गेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे चैनल गेट आणि लॉक तोडून आत प्रवेश केला व ₹7,00,000 रोख रक्कम चोरी केली.
या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 570/2025 कलम 305(A), 331(3) भा.दं.सं. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा आकाश भास्कर लिखे (वय 25 वर्ष, रा. भगतसिंग नगर, जालना) याने केला आहे. त्यावरून पोलिसांनी बदनापूर येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून ₹6,40,000 रोख रक्कम, चोरीच्या पैशात खरेदी केलेला ₹22,500 किंमतीचा मोटो एज 60 फ्युजन मोबाईल, ₹500 किंमतीचा ब्लूटूथ हेडसेट, आणि ₹1,000 किंमतीचा आयटेल कंपनीचा बेसिक मोबाईल असा एकूण ₹6,64,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पो.उ.नि. राजेंद्र वाघ तसेच अमंलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर आणि संदीप चिंचोले यांच्या पथकाने केली.
या त्वरित कारवाईमुळे जालना पोलिसांविषयी नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास वाढला आहे. पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
