जालना | लोकप्रश्ना न्यूज | दि. १० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्रातील वीज क्षेत्रात आजपासून मोठा खळबळजनक संप सुरू झाला आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील सुमारे ८५,००० कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी यांनी ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ७२ तासांचा राज्यव्यापी संप सुरू केला आहे. या संपाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
🔹 संपाचे कारण आणि पार्श्वभूमी
महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरेंटो इत्यादी खाजगी कंपन्यांना परवाने देण्याचा प्रस्ताव, तसेच महानिर्मिती कंपनीच्या चार जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण, पारेषण कंपनीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग, ३२९ विद्युत उपकेंद्रांचे खाजगी ठेकेदारांना हस्तांतरण, अशा निर्णयांचा तीव्र विरोध कृती समितीकडून करण्यात आला आहे.
तसेच कर्मचाऱ्यांची कामाचे तास निश्चित करणे, रिक्त पदे मागासवर्गीय आरक्षणासह भरणे, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करणे, आणि वीज ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नवीन शाखा व उपविभाग स्थापन करणे, या मागण्या सुद्धा संपात मांडण्यात आल्या आहेत.
🔹 कर्मचाऱ्यांच्या मते
वीज कर्मचाऱ्यांचा हा संप कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नसून, वीज ग्राहकांना स्वस्त वीज, तत्पर सेवा आणि सार्वजनिक वीज उद्योगाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी आहे.
२०२१ मध्ये राज्यात वीज ग्राहकांची संख्या २ कोटी ८९ लाख इतकी होती. मात्र २०२५ पर्यंत ती वाढून ३ कोटी १७ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या वाढलेल्या संख्येनुसार कर्मचाऱ्यांची, उपविभागांची आणि शाखांची वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून सेवागुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
🔹 कृती समितीची भूमिका
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या मते,
“व्यवस्थापनाने एकतर्फी पद्धतीने पुनर्रचना अंमलात आणली. कामगार संघटनांशी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्तही बदलण्यात आले. त्यामुळे नाईलाजाने संपाचा मार्ग स्वीकारावा लागला.”
कृती समितीने स्पष्ट केले आहे की, हा संप सार्वजनिक हितासाठी असून, वीज ग्राहकांना योग्य दरात वीज मिळावी, तसेच सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण रोखण्यासाठी करण्यात आला आहे.
🔹 प्रमुख संघटना संपात सहभागी
या संपात महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यात –
-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन
-
महाराष्ट्र वीज कामगार महासंघ
-
सर्बोर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन
-
महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (INTUC)
-
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना
-
तांत्रिक कामगार युनियन (5059)
या संघटनांचा सक्रिय सहभाग आहे.
🔹 सरकारला आवाहन
कृती समितीने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना या संपाबाबत हस्तक्षेप करून सन्माननीय तोडगा काढावा, असे आवाहन केले आहे.
संपामुळे राज्यभर वीज सेवांवर आंशिक परिणाम दिसून येत असून, ग्राहकांनी संयम राखावा, असे आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे.
📍लेखक – लोकप्रश्ना न्यूज संपादकीय विभाग
#MahavitaranStrike #महा_संप #वीजकर्मचारीसंप #MaharashtraNews #LokprashnaNews #महावितरण #महापारेषण #महानिर्मिती #ElectricityStrike
