जालना (प्रतिनिधी) – जालना महानगरपालिका हद्दीत व परिसरातील अनेक गावांमध्ये खोटे शिक्के व बनावट स्वाक्षऱ्या करून फर्जी एन.ए. लेआउट आणि अकृषिक परवाने तयार करून तब्बल 70 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी काँग्रेस कमिटी जालना यांच्या वतीने जिल्हा महिला अध्यक्ष नंदाताई पवार, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी आणि शहर उपाध्यक्ष विनोद यादव यांनी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन उच्चस्तरीय चौकशी व आरोपींवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे.
फर्जी नकाशे, अकृषिक परवाने आणि बनावट शिक्क्यांचा खेळ
तक्रारीनुसार, जालना शहरातील गट क्रमांक 155/ब, 159/1, 158, 157, 195/2 तसेच सिंधी काळेगाव, सावरगाव आणि इतर ठिकाणी काही भू-माफियांनी नकली शिक्के व स्वाक्षऱ्या करून बनावट नकाशे आणि अकृषिक परवाने तयार केले. नंतर हे प्लॉट विकताना गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोटारसायकल, कार, सोने-चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू लकी ड्रॉद्वारे देण्याचे आमिष दाखवले.
आरोपींची यादी आणि गैरव्यवहार
या प्रकरणात शेख मुश्ताक शेख अमीर, संदीप बद्रीनारायण तोष्णीवाल, विशाल माणिकसिंह परदेशी आदींची नावे तक्रारीत नमूद आहेत. आरोपानुसार, या व्यक्तींनी नाली, पाईपलाईन व इतर मूलभूत सुविधा न देता हजारो लोकांना फसवून प्लॉट विकले. एवढेच नव्हे तर काही भूखंड प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या मार्गात येऊनही विकण्यात आले, ज्यांचा 7/12 उतारा सुद्धा झाला नव्हता.
फर्जी तहसीलदार स्वाक्षऱ्या व महसूल न भरता विक्री
अनेक प्रकरणांत तहसीलदार यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व शिक्के वापरून अकृषिक आदेश दाखवण्यात आले. संबंधित जमिनीवर महसूल कर किंवा सरकारी शुल्क न भरता, नागरिकांकडून नोंदणी शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करण्यात आली.
पोलिस मिलीभगत आणि जामीन अर्ज फेटाळले
तक्रारदारांच्या मते, या घोटाळ्याचे आरोपी पोलिस अधिकाऱ्यांशी मिलीभगत करून खुलेआम फिरत आहेत. काही आरोपींचे अग्रिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले असले तरी अद्याप कठोर कारवाई झालेली नाही.
काँग्रेसची मागणी आणि विधानसभा गाजवलेला मुद्दा
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पीडित नागरिकांना वैध नोंदणी हक्क देण्याची, उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून सखोल तपास करण्याची आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या भूखंड घोटाळ्याचा मुद्दा जालना आमदार अर्जुन खोतकर यांनीही विधानसभा अधिवेशनात मांडला होता. त्यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली होती, अशी माहिती विनोद यादव आणि विजय चौधरी यांनी दिली.

thc softgels for sleep provide gentle nighttime relief