सतत पैशांची मागणी, मारहाण आणि मानसिक छळामुळे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू; पती, सासू, सासरे आणि नणंदविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंठा शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सुष्टी संकेत मनीयार या 21 वर्षीय विवाहितेने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून 17 जुलै 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुष्टीचा विवाह 4 एप्रिल 2024 रोजी मंठा येथील गणेश मंगल कार्यालयात संकेत कैलास मनीयार याच्याशी पार पडला होता. सुष्टी ही इंदेवाडी (ता. अंबड, जि. जालना) येथील राहिवासी होती. विवाहात वरपक्षाच्या मागणीनुसार तिच्या वडिलांनी 5 ग्रॅम सोन्याचे कानातले, 3 ग्रॅमची अंगठी आणि संसारोपयोगी भांडी दिली होती.
लग्नानंतर काही दिवस सासरच्यांचा वागणूक ठीक होती, मात्र मागील सहा महिन्यांपासून पती संकेत, सासरा कैलास मनीयार, सासू किरण मनीयार आणि नणंद अंकिता भुतडा यांनी मिळून सुष्टीवर पैशासाठी सतत तगादा लावायला सुरुवात केली. संकेत याच्या व्यवसायात नुकसान झाल्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तो सुष्टीला माहेरहून पैसे आणायला भाग पाडत होता.
सुष्टीने हे सगळं आपल्या आई-वडिलांना सांगितलं. त्यानंतर तिला सासरी परत पाठवताना तिच्या आईवडिलांनी जावयाला एक लाख रुपये दिले आणि तिला त्रास देऊ नका, अशी विनंती केली. त्यावेळी सर्व सासरचे लोक उपस्थित होते.
पण तरीही छळ थांबला नाही. काही दिवसांनी सुष्टीने पुन्हा फोन करून सांगितले की तिला पुन्हा पैशासाठी मारहाण केली जात आहे. मग तिला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एक लाख रुपये दिले गेले.
17 जुलै 2025 रोजी सायंकाळी शिवप्रसाद काशिनाथ मोहता यांनी फोन करून सुष्टी गंभीर असल्याचे सांगितले. रात्री 12 वाजता सुष्टीचे वडील उमेश मोहता, आई व इतर नातेवाईक सरकारी रुग्णालय मंठा येथे पोहोचले असता सुष्टी मृत अवस्थेत आढळून आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी सासरचे कोणीही उपस्थित नव्हते आणि मृतदेह सोडून ते फरार झाले होते.
सुष्टीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पती संकेत मनीयार, सासरा कैलास रामेश्वर मनीयार, सासू किरण मनीयार आणि नणंद अंकिता भुतडा यांनी सुष्टीला पैशासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं.
पोलिसांनी या प्रकरणात सकल गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Read More : पालखीमध्ये घुसलेल्या महिला चोर पकडल्या; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

One thought on “हुंड्याच्या जाचाला कंटाळून सुष्टी मनीयारची आत्महत्या, सासरचे नातेवाईक मृतदेह टाकून फरार”