jalna sagar dhanure murder case accusedarrested

जालना : सागर धानुरे हत्याकांडाचा पर्दाफाश | 24 तासांत दोघे आरोपी जेरबंद

जालना शहरात कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुण सागर धानुरे याच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र सखोल चौकशीत ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत या खुनाचा छडा लावत दोघा आरोपींना अटक केली आहे.

दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 56/2025 नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले.

पैशांच्या वादातून हत्या झाल्याचा उलगडा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत असताना कल्याण गणपतराव भोजने (वय 41, रा. समर्थ नगर, जुना जालना) याचा संशयावरून शोध घेण्यात आला.

चौकशीत असे समोर आले की, मयत सागर धानुरे व आरोपी कल्याण भोजने यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरून दीर्घकाळ वाद सुरू होते. या वादातूनच सागर धानुरे सतत आरोपीला पैशांसाठी त्रास देत होता.

15 दिवसांपूर्वी रचला होता खुनाचा कट

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याच्याशी संपर्क साधून सागर धानुरे याची हत्या करण्याचा कट साधारण 15 दिवसांपूर्वी रचला होता. या हत्येच्या बदल्यात 25 लाख रुपयांची सुपारी देण्याचे कबूल करण्यात आले होते.

कलावती रुग्णालयासमोर हत्या

दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजता आरोपी कल्याण भोजने याने सागर धानुरे याला जालना येथील कलावती रुग्णालयासमोर बोलावून घेतले. याची माहिती आधीच आरोपी कमलेश झाडीवाले याला देण्यात आली होती.

कमलेश झाडीवाले आपल्या कारने घटनास्थळी पोहोचला व सागर धानुरे याच्या शेजारी बसून त्याच्याशी बोलण्यात गुंतवले. याच वेळी त्याने सोबत आणलेल्या गावठी पिस्तुलातून सागर धानुरे याच्या गळ्याजवळ दोन गोळ्या झाडल्या. सागर धानुरे याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने चाकूने छाती व गळ्याजवळ वार करून त्याची खात्रीशीर हत्या केली.

आरोपी फरार; पोलिसांनी घेतले ताब्यात

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे कमलेश झाडीवाले याचा माग काढत त्याला नागेवाडी टोलनाक्याजवळ अडवून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांची जलद कारवाई; नागरिकांत समाधान

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे जालना शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

Watch Full Youtube Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top