जालना जिल्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि ओव्हरस्पीडिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेला अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाले आहे. या नव्या तांत्रिक सुविधेमुळे रस्ते सुरक्षा अधिक सक्षम होणार असून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
या इंटरसेप्टर वाहनामध्ये ANPR कॅमेरा, हाय डेफिनिशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, लेझर स्पीड गन, अल्ट्रा झूम सिस्टीम आणि टिंट मीटर अशी आधुनिक साधने बसवण्यात आली आहेत. या उपकरणांच्या मदतीने वाहनांचा वेग क्षणार्धात मोजता येणार असून ओव्हरस्पीडिंग करणाऱ्या चालकांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाईल.
जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की वाहन चालवताना वेगमर्यादेचे काटेकोर पालन करा, हेल्मेट आणि सीटबेल्ट अनिवार्यपणे वापरा आणि वाहतूक नियमांचे पालन करा. नियमभंग केल्यास आता केवळ इशारा नव्हे तर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक अनुभवकर बनसोड, पोलीस अधिकारी आयुब नोपाणे, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्री. रोहित निकालजे, तसेच वाहतूक विभागातील एम. एम. मोथले, सुभाष चौधरी आणि इतर अधिकारी सक्रिय भूमिका बजावत आहेत.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की रस्ते अपघात कमी करणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हेच या कारवाईचे प्रमुख उद्दिष्ट असून ही मोहीम सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे.
