जालना शहरातील विजय विलास सभागृहात व्यापारी महासंघाच्या वतीने दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनीत साहनी यांनी केले होते.
सभेच्या सुरुवातीला विनीत साहनी यांनी धर्मेंद्र देओल यांच्या कार्याचे, त्यांच्या अद्वितीय अभिनयाचे आणि साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्वाचे स्मरण करून भावनिक शब्दांत प्रस्तावना मांडली.
कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी धर्मेंद्र यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवास, त्यांचे सामाजिक योगदान आणि त्यांनी उभा केलेला आदर्श याबद्दल सविस्तर माहिती दिली.
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिवंगत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीचे अमर कलाकार होते. त्यांचे योगदान आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
विधायक अर्जुन खोतकर यांनीही श्रद्धांजली अर्पित करताना एक विशेष आठवण सांगितली. ते म्हणाले की, “मी प्रथमच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री झालो तेव्हा एका महत्त्वाच्या योजनेचे उद्घाटन धर्मेंद्र देओल यांच्या हस्ते करण्याचा मान मला मिळाला. त्यानंतर आमच्या कुटुंबीयांमध्ये आत्मीय आणि पारंपरिक नाती निर्माण झाली, जी आजही कायम आहेत.”
या कार्यक्रमाचे संचालन आशीष रसाळ यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाला पंडित भुतेकर, विष्णु पांचफूले, अभयकुमार यादव, गेंदालाल झुंगे यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मेंद्र देओल यांच्याप्रती जालना शहराने व्यक्त केलेली ही श्रद्धांजली त्यांच्या कलात्मक योगदानाची आणि लोकांच्या मनातील त्यांच्या अमिट स्थानाची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित करते.
Watch Video
