जालना शहरातील घरफोडी प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी दोन चोरांना जेरबंद करून ₹17 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जालना शहरात घडलेल्या मोठ्या घरफोडी (house robbery in Jalna) प्रकरणाचा उलगडा कदीम जालना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत केला आहे. दोन चोरांना अटक करून तब्बल ₹17 लाख 76 हजार 161 रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महानगरपालिकेसमोर असलेल्या शिवशक्ती मिल परिसरात राहणारे किराणा व्यापारी नरेंद्र गुलाब शहा सावजी यांच्या घरात 11 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ताले तोडून चोरी केली होती. घरात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेली चांदीची विट आणि रोख रक्कम, मिळून एकूण ₹17,76,161 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
नरेंद्र सावजी हे त्यादिवशी सायंकाळी आपल्या सौरभ सुपर शॉपी दुकानात साफसफाईसाठी गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ₹9 लाख 42 हजार रोख पैसे आणि ₹8 लाख 34 हजार 161 रुपये किंमतीची एक किलो चांदीची विट, जी भारत ज्वेलर्स, जालना येथून 18 आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी खरेदी करण्यात आली होती, ती चोरी केली.
या प्रकरणी तक्रार दाखल होताच कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाची सूत्रे उपनिरीक्षक डी. एस. मोरे यांच्या हाती देण्यात आली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा मागोवा घेत अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड (दोघे रा. माणिपुरा, जालना) यांची ओळख पटवली.
पोलिसांनी 12 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गांधी चमन परिसरात सापळा लावून दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेली चांदीची विट आणि रोख रक्कम त्यांच्या ताब्यातून हस्तगत केली.
ही कारवाई कदीम जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. बी. शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक डी. एस. मोरे, अमलदार सदा राठोड, पोलीस नाईक बाबा गायकवाड, दिलीप गायकवाड, संदीप चव्हाण, मतीन शेख, इमरान शेख, अमजद पठाण, धर्मपाल सुरडकर, महिला पोलीस शिवकन्या बोराडे तसेच तांत्रिक सहाय्यक सागर बाविस्कर यांचा समावेश होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले की –
“कदीम जालना पोलिसांनी तांत्रिक मदतीचा योग्य वापर करून अत्यंत कमी वेळेत गुन्हेगारांना पकडत चोरीचा माल जप्त केला आहे. नागरिकांनी घरांची सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही आणि मजबूत ताले लावावेत.”
ही कारवाई जालना पोलिसांच्या दक्षता, तांत्रिक कौशल्य आणि त्वरित प्रतिसादाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.
